वाढीव शेअर ऑटो स्टँडचे उद्घाटन; विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, विमानतळासह मेट्रो, थिएटर आणि कार्गो क्षेत्रातील कामगारांचे संघटन
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ येथील भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेच्या कार्यालयात संघटनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई विमानतळावरील वाढीव शेअर ऑटो स्टँडचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दटके आणि संघटनेचे सल्लागार तथा माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात संघटनेच्या विस्ताराला गती देण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. यामध्ये आमदार विक्रांत पाटील यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी, संतोष धुरी यांची राष्ट्रीय महासचिवपदी, राजेश महाडिक यांची मुंबई वाहतूक विभागाच्या उपाध्यक्षपदी, तर उमर पटेल यांची मुंबई माथाडी विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध नामांकित कंपन्या आणि क्षेत्रांतील शेकडो कामगारांनी राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेत प्रवेश केला. यामध्ये Ajile Airport Services Pvt. Ltd. (IndiGo) मधील ३०० हून अधिक कामगार, INOX PVR थिएटर्स तसेच मुंबईतील विविध चित्रपटगृहांमधील २५० कामगार आणि GSEC Skyhigh Airport Services Pvt. Ltd. च्या सांताक्रूझ कार्गो टर्मिनलमधील २५ कामगारांनी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले.
याशिवाय महामुंबई मेट्रोमधील कामगार, अंधेरी विभागातील ऑटो रिक्षाचालक तसेच कार्गो विभागातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीही संघटनेत प्रवेश केला. त्यामुळे विमानतळ, वाहतूक, मेट्रो, चित्रपटगृहे आणि कार्गो अशा विविध क्षेत्रांमध्ये संघटनेचा विस्तार अधिक व्यापक झाला आहे.
यावेळी संघटनेचे महासचिव बलबीर सिंह नेगी यांनी सांगितले की, विविध क्षेत्रांतील कामगारांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांचे, समस्या आणि हितांचे संरक्षण करणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विविध क्षेत्रांतील कामगारांचा वाढता सहभाग ही संघटनेच्या एकजुटीची ताकद असून, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल.
No comments:
Post a Comment