Wednesday, 24 December 2025

“कीर्तनमंदाकिनीचा सूर हरपला…”

“कीर्तनमंदाकिनीचा सूर हरपला…”

दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सुप्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार, ह.भ.प. मंजुश्रीताई खाडिलकर यांचे पुण्यात अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गेली ६८ वर्षे अविरत अखंड कीर्तनसेवेत रममाण असलेल्या मंजुश्रीताई या केवळ श्रेष्ठ कीर्तनकारच नव्हे, तर माझ्या कीर्तनगुरू व सासूबाई सुद्धा होत्या.
वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी नारदीय कीर्तन परंपरेचे व्रत हाती घेतले. महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश आदी अनेक प्रांतांत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीचे महान कार्य केले. विशेष म्हणजे, पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात त्यांनी थेट खलिस्तानवादी अतिरेकी भिंद्रांवालेसमोर हिंदी व पंजाबी भाषेत निर्भय कीर्तन केले, हा त्यांच्या धाडसाचा आणि वैचारिक ठामपणाचा विलक्षण दाखला होता. इंग्लंड, अमेरिका व कॅनडा येथे तब्बल तीन महिने कीर्तनसेवेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व कलेचा प्रचार-प्रसार करणाऱ्या त्या युरोप व अमेरिका दौरा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कीर्तनकार ठरल्या.

त्यांच्या कार्याचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर संपूर्ण भारतभर त्यांनी सादर केलेली १०० कीर्तने. या कीर्तनांतून मिळालेले संपूर्ण मानधन त्यांनी दादर येथील स्वा. सावरकर स्मारकाच्या उभारणीस अर्पण केले.
मंजुश्रीताईंनी ६५ वर्षे महिलांना भजन-कीर्तनाचे शिक्षण देत ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवले. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या उषाताई विश्वनाथ कराड यांना त्या गुरुस्थानी होत्या. संत सखू, लाखा कोलाटी व नरसी मेहता यांच्या आख्यानांवर त्यांची विशेष श्रद्धा होती. आजच्या अनेक नवोदित कीर्तनकारांना त्यांनी हा वैचारिक व कलात्मक ठेवा दिला..अत्यंत मधुर आवाज, उच्च प्रत्युत्पन्नमती, शास्त्रीय व नाट्यसंगीताचा प्रभावी वापर, रसपूर्ण कथनशैली – हे त्यांच्या यशस्वी कीर्तनाचे वैशिष्ट्य होते.

वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य साक्षात धुंडा महाराज देगलीकर यांनी त्यांना सन्मानार्थ वीणा प्रदान केली, तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना “कीर्तनमंदाकिनी” ही उपाधी बहाल करण्यात आली. अनेक सन्मान व पुरस्कार मिळूनही त्या आजवर शासकीय पुरस्कारापासून वंचित राहिल्या, याची खंत त्यांची सून व कीर्तनकार ह.भ.प. वीणा त्यागराज खाडिलकर यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या भजन-कीर्तन परंपरेचा वारसा त्यांनी राज्ञी, मोक्षा, तेजसा, ग्रीष्मा, सोहमादित्य व यशराज या नातवंडांसह असंख्य शिष्यांना सुपूर्त केला. त्यांच्या पश्चात तीन अपत्ये – सुप्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर, नटराज खाडिलकर व अमृता खाडिलकर – संगीत क्षेत्रात अविरत सेवा देत आहेत.
शेवटच्या श्वासापर्यंत भजनात रममाण असलेल्या, कीर्तनमंदाकिनी ह.भ.प. मंजुश्रीताई खाडिलकर यांच्या कीर्तनसेवेला
शेवटचा रामकृष्ण हरी…!!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना. 🙏

© लेखिका :
कीर्तनकार डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर

No comments:

Post a Comment