Monday 29 October 2018

अबब! पालिकेच्या लेखापरीक्षक आणि लेखापाल खात्यात अवघा एकच चार्टर्ड अकाउंटंट 

रु 27,258 कोटी इतका अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेकडे खर्च होणारा पैसा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लेखापरीक्षक आणि लेखापाल अशी महत्त्वाची खाती तर आहेत पण या खात्यात अवघा एकच अधिकारी हा चार्टर्ड अकाउंटंट असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे माहिती मागितली होती की पालिकेच्या लेखापरीक्षण खात्यात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी वृंदापैकी किती अधिकारी आणि कर्मचारी हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सामान्य प्रशासनच्या उप प्रमुख लेखापाल यांनी अनिल गलगली यांस कळविले की प्रमुख लेखापाल ( वित्त) यांच्या खात्यात चार्टर्ड अकाउंटंट अर्हता धारण करणारे राजपूत महेंद्रकुमार भगवानसिंह, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक हे एकमेव कर्मचारी आहेत. या खात्यात प्रमुख लेखापाल, उप प्रमुख लेखापाल अशी विविध 18 पदनाम असलेल्या ठिकाणी 1473 अधिकारी आणि कर्मचारी वृंद कार्यरत आहेत. यात अवघे एकमेव चार्टर्ड अकाउंटंट अर्हता असलेले अधिकारी आहेत.


महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खात्यात 559 पदे असून एकही पद धारण करणारा चार्टर्ड अकाउंटंट नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेत लेखापरिक्षणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक खात्यांकडून केले जाते आणि प्रमुख लेखापाल ( वित्त ) हे ही काम पाहतात पण इतक्या श्रीमंत असलेल्या महानगरपालिकेत चार्टर्ड अकाउंटंट नसणे ही बाब गंभीर असल्याची बाब अनिल गलगली यांनी नमूद केली आहे.  चार्टर्ड अकाउंटंट असलेले अधिकारी असले तर भ्रष्टाचार आणि अनियमितता ही त्याचक्षणी उघडकीस येऊ शकते आणि भविष्यात महानगरपालिकेला फायदा होऊ शकतो, असे सांगत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र लिहीत याबाबीकडे लक्ष वेधले आहे.


मुंबई महानगरपालिकेत चार्टर्ड अकाउंटंट नसणे ही बाब चिंताजनक असताना राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे कारण राज्य सरकारतर्फे मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्यासाठी पाठविण्यात आलेले मुख्य लेखापरीक्षक हे सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट नाहीत. मुख्य लेखापरीक्षक या पदाची नियुक्ती राज्य सरकारकडून केली जाते.

No comments:

Post a Comment